नानांचा विरोधकांसह पक्षांतर्गत इच्छुकांनाही दणका, म्हणाले- कोणाची काय क्षमता हे पक्षाला माहित

Foto

औरंगाबाद – विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी फुलंब्री मतदारसंघात रस्ते विकास कामांची सुरुवात करुन आगामी विधानसभा निवडणूक आपण लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यासोबतच काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांच्यावर जोरदार टोलेबाजीच केली नाही तर त्यांच्या गावातील काँग्रेस मुळापासून उखडून टाकण्याचेही प्रयत्न केले आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नानांचे आव्हान कायम राहाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

काँग्रेसच्या ताब्यातील फुलंब्री मतदारसंघ हरिभाऊ बागडेंनी मागील निवडणुकीत खेचून आणला. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्वतंत्र लढल्याचा फायदा नानांना झाला होता. त्यासोबतच मोदी लाटेचाही लाभ त्यांना मिळाला होता. आमदार झाल्यानंतर हरिभाऊंना थेट विधानसभा सभापतीपदाची खुर्ची मिळाली. जनसंघापासून पक्षासोबत असलेल्या नानांची एवढ्या वर्षांची तपश्चर्या फळाला आली, अशाच प्रतिक्रिया तेव्हा त्यांच्या मतदारसंघातील ज्येष्ठांनी व्यक्त केली होती. विधानसभा सभापती असलेले हरिभाऊ बागडे आगामी निवडणूक लढवतील की नाही अशी शंका काही दिवसांपासून उपस्थित केली जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. २०१४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रतिस्पर्धी राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा चव्हाण यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मागील काही महिन्यांपासून त्या देखील मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी फुलंब्री विधानसभा लढवण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. नानांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला तर आपण या मतदारसंघातून लढण्यास तयार असल्याचे त्यांनी सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितले होते.

अनुराधा चव्हाण यांच्या वक्तव्याच्या दुसऱ्याच दिवशी हरिभाऊ बागडेंनी मतदारसंघात रस्ते विकास कामांचे भूमिपूजन करुन आगामी निवडणुकीतही आपणच उमेदवार असल्याचे संकेत दिले. संयमी आणि शांत स्वभावाचे नाना यांना आगामी निवडणुकीत फुलंब्रीमधून कोण उमेदवार असेल याबद्दल विचारले असता, उमेदवार ठरवण्याचा अधिकार पक्षाचा असल्याचे त्यांनी सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितले.

 

बागडे म्हणाले, वैयक्तिक इच्छा प्रत्येकाची असू शकते. इच्छा असण्यात काही गैर नाही. परंतू स्वतः इच्छा व्यक्त करण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी म्हटले पाहिजे, पक्षाने म्हटले पाहिजे. मतदारसंघात कोणाचे काय काम आहे, निवडून येण्याची कोणाची क्षमता आहे, याचा आढावा पक्ष घेत असतो. उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा पक्षाचा असतो. कोणाचेही नाव न घेता हरिभाऊ बागडेंनी पक्षातील इच्छूकांना तुमचे मतदारसंघात काय काम आहे, असाच सवाल उपस्थित केला. त्यामुळे आगामी विधानसभा लढवण्यासही ते तयार असल्याचेच त्यांनी स्पष्ट केले.


कल्याण काळेंवर तुफान टोलेबाजी

रस्ते विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात हरिभाऊ बागडेंनी कल्याण काळे आता कुठे पळून गेले असा सवाल करत त्यांच्यावर तुफान टोलेबाजी केली. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमीनी मागिल सरकराने घेतल्या. शेतकऱ्यांना जमीन देण्यासाठी स्थानिक आमदारांनी भरीला घातले. मात्र शेत जमीनींचे अधिग्रहण झाल्यानंतर आमदार कुठे पळून गेले कोणाला कळलेच नाही, असा टोला त्यांनी कल्याण काळे यांना लगावला. याच कार्यक्रमात कल्याण काळे यांच्या पिसादेवी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा काळे यांना मोठा दणका मानला जात आहे. 



Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker